२०२३ संपून २०२४ सुरू होईल. २०२३ वर्ष नेहमीप्रमाणेच चांगले वाईट अनुभव देऊन गेलं. अनेक प्रश्न अजूनही मनात आहेतच. उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालूच आहे. काही तर्कशुद्ध वाटणाऱ्या गोष्टी तर्कहीन वाटायला लागल्या आहेत. वास्तविकता आणि आभास यातील सीमारेषा खरंच धूसर होत असल्याचे जाणवायला लागलं आहे .
इथे तर शब्दांचे अर्थही बदलायला लागले आहेत असा विचार येत असतानाच हातात पडले ते सत्या नाडेला यांचे “हिट रिफ्रेश”.
ब्राउझरचं रिफ्रेश बटन दाबल्यावर त्याचा काही भाग तसाच राहतो आणि काही भाग नव्याने दाखविला जातो. यातूनच बिल गेट्स यांनी प्रस्तावनेत या पुस्तकाची समर्पकता दाखवली आहे. ही गोष्ट खरंतर पुस्तकाच्या नावासाठीच नाही तर आपल्या जीवनासाठी पण किती समर्पक आहे; नाही का? काही गोष्टी आहे तशाच चालू ठेवाव्यात पण काही मात्र बदलाव्यात. क्रिकेट आणि संगणक या दोन्ही गोष्टी नाडेलांच्या आवडीच्या. बारावीत असताना हैदराबादकडून क्रिकेट खेळून बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणारे नाडेला. आवडत्या गोष्टी केल्या की आनंदाबरोबरच यशही मिळते हे आईचे; तर मोठी स्वप्ने पाहून ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे वडिलांचे विचार या दोन्हींची सांगड घालून रिफ्रेश बटन हिट केले आणि इंजिनिअरिंगची पदवी घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळे टप्पे पार करत मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ झाले.
खरंच शोधावं का रिफ्रेश बटन या वर्षात.
“At the core, Hit Refresh is about us humans and the unique quality we call empathy, which will become ever more valuable in a world where the torrent of technology will disrupt the status quo like never before.” – Satya Nadella from Hit Refresh
रिफ्रेश बटन शोधत असतानाच मॉर्गन हाऊसेल यांचे “सायकॉलॉजी ऑफ मनी” पुढील वर्षासाठीच नाही तर आयुष्यासाठीचे तत्त्वज्ञान देऊन गेले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली स्वप्ने किंवा गरजा वेगवेगळी असू शकतात. त्यासाठी बदल हा स्वाभाविक आहे, तो स्वीकारा आणि पुढे जा; हेच तर जीवन. पैशाचे मानसशास्त्र समजावताना जीवनाचे सारच मांडले आहे मॉर्गन हाऊसेलनी. गरज आणि इच्छा यातील फरक कळणे महत्त्वाचे. कधी, काय आणि का हवे ते समजले तर आयुष्य सोपे होईल.
अर्थात अचानक गोष्टी घडतात आणि सर्व ठरवलेले बिघडून जाते.
“You can’t control surprises, but you can control how you prepare for them.”
"Planning is important, but the most important part of every plan is to plan on the plan not going according to plan."
-Morgan Housel from The Psychology of Money
आपण ठरवतो एक आणि घडते वेगळेच. अगदी मागच्या महिन्यापासून ठरवत होते, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मस्त कुठेतरी दोन-तीन दिवस निवांत जाऊन येऊ. पण अचानक अशा घटना घडल्या आणि वर्ष सुरु व्हायच्या आधीच plan चौपट झाला. पण ‘लेट इट गो’.
'लेट गो' किंवा सोडून दे, परत करू की plan असं मनाला समजवायचं. अर्थात शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हे गरजेचे वाटते आहे.
नवीन वर्ष नव्या संधी आणि नवीन आव्हाने घेऊन येईल. ‘लेट गो’ च्या यादीत नवीन गोष्टी येत रहातील. प्रत्येकाला आपल्यासाठी आपलं रिफ्रेश बटन शोधावे लागेल.
डॉ. स्नेहल कमलापूर
0 comments:
Post a Comment
Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment