Sunday, October 1, 2023

गौराई


आज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बोलू जरा. आमच्या येण्याने तुम्हा बायकांना अगदी उसंत मिळत नाही. आमच्या तरी किती तर्‍हा. तुझ्याकडेच बघ एक येते श्रावणात शुक्रवारी आणि दुसरी भाद्रपदात. काही जणी सुगडावर, काही उभ्या, काही तांब्यावर, काही पानांवर तर काही खड्यांच्या अशा वेगवेगळया पद्धती. त्याबरोबरच ते साग्रसंगीत जेवण. पुरणपोळ्या, सोळा भाज्या, कोशिंबिरी, चटण्या आणि करंज्या, लाडू, अनारशासारखे फराळाचे पदार्थ. कदाचित हे पूर्वापार चालत आले किंवा या हवामानात सर्व भाज्या चांगल्या मिळतात किंवा सर्व रस आपल्या जेवणात असले तर ते स्वास्थ्यवर्धक असते म्हणून असावे. खरंतर सध्याच्या जमान्यात हे रुचकर पदार्थ योग्य पद्धतीने केले तर गप्पा मारायला आलेल्या मैत्रिणींना पटकन देता येतील म्हणून हे फराळाचे पदार्थ असावेत. या निमित्ताने तुम्हा मैत्रिणींना छान सजून एकमेकींकडे जाऊन मनसोक्त गप्पा मारता येतात. पण बर्‍याच वेळा सर्वच गोष्टींचे अवडंबर माजवले जाते. त्यामुळे तुम्हा बायकांची खूपच धावपळ होते. आपल्याला जमेल तसे मनोभावे करावे. 

बाकी तुझे Women networking कसे चालले आहे? महिला सक्षमीकरण झाले तर त्या समर्थपणे आणि सजगतेने जबाबदारी पेलू शकतात हा जी-२० परिषदेचा आणि तुझा अजेंडा सारखाच आहे की. त्यासाठी महिलांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-२० परिषदेने उचललेले पाऊल अगदी योग्यच वाटलं. 

शैक्षणिक प्रगती बरोबर घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे. अर्थात मुलगी शिकली की प्रगती होतेच पण निर्णय प्रक्रियेत जर महिलांचा सहभाग असेल तर सामाजिक विकास नक्कीच लवकर होऊ शकतो. मंगलयान, चांद्रयान आणि आदित्य एल 1 या सर्व अंतराळ मोहीमा यशस्वी करण्यासाठी स्त्री स्त्रियांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. 

सध्या जागतिक स्तरावर ज्या समस्यांना सामोरे जात आहोत त्यामध्ये हवामान बदल आणि सायबर सुरक्षा या महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही मध्ये जी-२० परिषदेमध्ये सुचविल्याप्रमाणे सायबर सुरक्षेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आणि ते राबविण्यात महिलांचा सहभाग असणे आवश्यकच आहे. तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जावीत यासाठी महिलांकडे नेतृत्व असणे गरजेचे वाटते. अगदी छोटसं उदाहरण घेतलं तर हे लक्षात येईल, घरात प्लास्टिकच्या वस्तू न वापरण्याचा निर्णय महिलांनी घेतला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे जगाला पटलेले असून समाजाच्या सर्व क्षेत्रात सक्रिय योगदान देण्यासाठी नारीशक्ती नक्कीच प्रभावी ठरेल. सध्या फक्त १० टक्के महिला सक्रिय राजकारणात आहेत. महिलांनी राजकारणात यावे यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असं वाटतं. 

वित्तीय प्रणालीमध्ये महिलांच्या समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर असायला हवे. याची सुरुवात अगदी शाळेत असल्यापासून होऊ शकते. म्हणूनच आपल्या स्कॉलरशिपच्या पैशातून गुंतवणूक करणार्‍या तुझ्या मुलीचे खरंच कौतुक वाटलं. "आई मी घेतलेला शेयर ११० टक्के वाढला, अजून घ्यायला हवे होते. क्रिकेट वर्ल्ड कप भारतात आहे तेव्हा हॉटेल किंवा ऑन लाईन फूड डिलिव्हरी शेयरच्या किमती वाढू शकतील का?" अशी तुमची चर्चा ऐकून छान वाटलं. 

अष्टावधानी असावे हे म्हणणे सोपे आहे पण निभावून नेणे तेवढेच अवघड . वेगवेगळया आघाड्यांवर लढताना ताणतणावांकडे, लक्ष द्यायलाच हवे. यासाठी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे त्याकडे मात्र तुम्ही बायका दुर्लक्ष करता. आहार, विहार आणि शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक स्वास्थ्य तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. स्वतःसाठी वेळ दे, स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष दे व एखादा छंद जोपास. 

निरोगी व सुखासमाधानात रहा हाच आमचा शुभाशीर्वाद !!! 


सौ. स्नेहल कमलापूर


0 comments:

Post a Comment

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment