संगीत हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे, वेगवेगळ्या अभिरुची प्रमाणे वेगवेगळे संगीत ऐकले जाते. यामध्ये शास्त्रीय संगीतापासून ते रॅप music पर्यंत आवड श्रोत्यांमध्ये दिसून येते.
सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. त्याच्या परिणामापासून संगीत ही कला सुद्धा वेगळी राहू शकली नाही किंबहुना सांगीतिक रसिकतेवर माध्यमांचा बडगा दिसून येतो. सगळ्यांनाच चांगलं म्हणण्याचा नादात खरंच चांगलं काय आणि वाईट काय हेच नवीन पिढीला कळत नाही की काय असं वाटायला लागतं. मुळात संगीताच्या रियालिटी शोजमुळे संगीत हे सहज शक्य आहे असं वाटायला लागतं पण मुळात चित्रच वेगळे आहे. सांगीतिक जडण-घडण, त्यासाठी लागणारा रियाज, गौण झाल्यासारखे वाटत आहेत.
शास्त्रीय संगीत या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहायला हवे. माध्यमांद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या कलाकारांना किती मान मिळतो हे आपल्याला माहीत आहे, पण सातत्य टिकवून सादरीकरण करणारे कलाकारच शेवटी रसिकांच्या मनावर राज्य करत असतात. गुरूंकडून मिळालेले शास्त्रोक्त ज्ञान, त्यावर केलेला स्वतःचा विचार, चिंतन, मनन याच्या अनुषंगाने केलेले सादरीकरण हेच परिणामकारक ठरू शकते, म्हणून ज्याला संगीतात करियर करायचे आहे त्याने आपला गुरु डोळसपणे निवडून आपले मार्गक्रमण करावे. माध्यमांच्या आहारी न जाता आधी स्वतःच्या प्रस्तुती करणाचा विचार करावा आणि स्वतःला सिद्ध करावे.
विद्यार्थ्यांच्या जडण-घडणामध्ये पालकांचा मोठा वाटा असतो. काही पालक डोळसपणे आपल्या पाल्याची प्रगती बघत असतात तर काही पालक अवास्तव अपेक्षा बाळगून असतात. अपेक्षा बाळगणे चूक नाही परंतु त्या दिशेने पावले उचलताना संयम ठेवणे अत्यावश्यक आहे.
एक शिक्षक म्हणून मला वाटतंय की मुलांनी आणि पालकांनी रियालिटी शोज बघावे आणि त्यातून प्रोत्साहन ही द्यावे पण त्याच्यामागे अवास्तव अपेक्षा बाळगणं कमी करावे, त्यापेक्षा आपल्या पाल्याला संगीत शिकण्यास प्रोत्साहन द्यावे.
सौ. मिनल कुलकर्णी - देशपांडे
(एम. ए. संगीत)