Friday, August 18, 2023

मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी

 



स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या पगाराचे प्रत्येकाकडून पत्र घेऊन घर घेण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून बॅंकेत निवेदन देणारी एक कष्टकरी महिला. एकीने घरच्या जबाबदाऱ्यासाठी नोकरी सोडली तर दुसरीने नोकरी करून घरची जबाबदारी घेतली. त्याचवेळी डोळ्यासमोर आलं ते विद्या बाळ आणि मेधा राजहंस यांनी संपादित केलेलं "मिळवतीची पोतडी" हे पुस्तक. 

या  पुस्तकाच्या प्रस्तावनेत विद्या बाळ म्हणतात, "पोतडी आणि अलिबाबाची गुहा उघडली की काय बाहेर येईल सांगता येत नाही". खरंच "मिळवतीची पोतडी" तून बाहेर पडतात ते अनुभवाचे बोल. 

मिळवती म्हणजे पैसा मिळवणारी असा खरंतर मर्यादित अर्थ. तो तसाच असावा का असाही प्रश्न पडतोच. 

अचानक मोहन गोखले हे जग सोडून गेल्यावर सुन्न झालेल्या स्वतःशीच लढून जिंकलेल्या शुभांगी गोखले. 
नोकरी, लेखन व अभिवाचन करून सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकरांची मुलगी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची आई याशिवाय वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वीणा देव. 
मजा म्हणून लॅक्मे साबणाचे मार्केटिंग, वर्तमानपत्रातील लिखाण व त्यानंतरची शिक्षण क्षेत्रातील नोकरी सोडून वर्ल्ड बँक प्रोजेक्टवर काम करताना शिक्षण क्षेत्रातील संलग्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगल्भ अनुभव असणाऱ्या व प्रकाश जावडेकरांची पत्नी याशिवाय स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या प्राची जावडेकर. 

ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. या बरोबरच कष्टकरी, नोकरी करणाऱ्या, नोकरी देणाऱ्या, पत्रकार, लेखिका, व्यवसाय करण्याऱ्या स्त्रियांपासून ते सामाजिक कार्य करणाऱ्या विविध स्तरातील मिळवत्या स्त्रियांची मिळवतीची पोतडी म्हणजे अनुभवाची समृद्धी आणि प्रगल्भतेचं अवकाश. 

मिळवतीच्या पोतडीत असलेल्या आर्थिक स्थैर्याच्या बटव्यात समाधान, स्वास्थ्य व प्रतिष्ठा तेवढीच महत्वाची वाटतात. येथे आहे ती धावपळ, शिस्त व सहनशीलतेच्या रेशीम धाग्यांनी गोफ विणत येणारी समृद्धी. 

साधारण २२-२३ वर्षांपूर्वीचा मिळवतीचा काटेरी मुकुट अजूनही बऱ्याच जणींसाठी तो काटेरीच आहे हे नक्की. जगण्यासाठीचा मोठा परीघ आखताना भावनिक गुंतणं, कोसळणं जाणवत राहतं. राग, लोभ, संघर्ष, रुसवे-फुगवे आणि असहकार या काट्याकुट्यातून, अपराधी न समजता वेगवेगळी नाती निभावून नेताना आयुष्याचा महत्वाचा टप्पा कधी पार होतो हेच समजत नाही. 

अर्थात हा जमाखर्च मांडताना अनुभवाची समृद्धी, सुसंगत विचार करण्याची ताकद, निर्णय क्षमता, आत्मविश्वास व आत्मभान यातून मिळणारे बौद्धिक समाधान आणि स्वातंत्र्य मिळवतीच्या या पोतडीतून डोकावतात.



डॉ. स्नेहल कमलापूर

Related Posts:

  • व्यक्त व्हा ! "किती आरडाओरडा करताय एकमेकांवर” "मीच का गप्प बसू, सारखीच चिडचिड असते ह्याची" "अग पण ओरडून काही उपयोग आहे का? शब्दाने शब्द वाढतो. आपल्या भाव… Read More
  • Different approach towards the goal and resolutions  २०२२ संपून सुरु होईल नवीन वर्ष २०२३. वर्षभरातील अनेक हव्या नकोशा घटनांच्या आठवणींबरोबरच पिंगा घालू लागतात ते ध्येय (goal) आणि संकल्प (Resolut… Read More
  • मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी  स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या… Read More
  • योग: एक परिपूर्ण जीवनशैली२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. … Read More
  • गौराईआज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बो… Read More

0 comments:

Post a Comment

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment