आषाढी एकादशी आणि चातुर्मासाच्या निमित्ताने उपवासाविषयी माझी काही प्रामाणिक मतं मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...आहारशास्त्राचा अभ्यास करताना, लोकांचं आहार-समुपदेशन करताना काही प्रश्न पडत गेले. उपवास आणि उपवासाच्या दिवशीचं खाणं-पिणं कसं असावं हा त्यापैकीच एक.
उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वेच्छेने काहीही न खाता-पिता राहणे. तसेच उपवास हा शब्द धार्मिक गोष्टी आणि परंपरा यांच्याशी सहसा निगडित असतो म्हणून आध्यात्मिक दृष्टीने विचार केल्यास उप – जवळ आणि वास – राहणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे असाही एक अर्थ असावा असं मला वाटतं.
उपवासाचे अनेक प्रकार दिसतात. कोणी उपवासाचे पदार्थ खाऊन-पिऊन उपवास करतात, कोणी काही न खाता-पिता करतात तर कोणी अगदी पाणीसुद्धा पीत नाहीत. तसेच कोणी आठवड्यातून एकदा, कोणी महिन्यातून किंवा वर्षातून एक-दोन वेळा तर कोणी सलग एक आठवडा, एक महिनादेखील उपवास करतात. उपासाची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु असे दिसून येते की जवळजवळ प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे. योग्य पद्धतीने आणि नियमित उपवास केल्यास त्याचे फायदे निश्चितच दिसतील.
सध्या आपण कसा उपवास करतो हे येतंय ना हळूहळू डोळ्यापुढे? बऱ्याच जणांकडे उपवासाच्या पदार्थांची किंवा सामान आणण्याची वेगळी यादीच तयार होते. साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर, बटाट्याचे पापड, बटाट्याचा कीस, चिप्स, बटाट्याची उकडलेली भाजी, रताळ्याचे तुपातले काप, रताळ्याची खीर, साबुदाणा-बटाट्याचा तळलेला चिवडा शेंगदाण्याचे लाडू इ. यादी संपते आहे की नाही असं वाटायला लागलं आहे... तोंडाला पाणीही सुटलं आहे. हो ना?
आता थोडा बारकाईने विचार करूया. बघा पटतंय का...या यादीतील जवळपास सगळेच पदार्थ पिष्टमय आहेत आणि भरपूर स्निग्धांश असलेले आहेत. यामुळे आपल्याला खूप अनावश्यक कॅलरीज मिळतात. म्हणजेच पोट भरतं पण शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. असं वरचेवर होऊ लागलं की शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.
उपवासाच्या खऱ्या अर्थाच्या जवळ पोहोचण्यासाठी प्रथम मिताहार म्हणजे अगदी कमी प्रमाणात किंवा आवश्यक तेवढेच खावे. एकादशी आणि दुप्पट खाशी हा गमतीचा भाग म्हणून ठीक आहे पण खरोखर तसे होत नाही ना याची काळजी घ्यावी. उपवासाच्या दिवशी सुद्धा आहारात योग्य तेवढी प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असलेच पाहिजेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, विविध प्रकारची फळे, सुका मेवा, राजगिरा, काही भाज्या इ. पदार्थांमधून आपल्याला समतोल साधता येऊ शकतो. आणि अर्थातच याबरोबर योग्य प्रमाणात पाणी पिणेही आवश्यक आहे.
ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर काही विकार असतील त्यांनी उपासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आहारात योग्य ते बदल करून आपल्या धार्मिक रूढी आणि परंपरा जपतानाच आरोग्यही जपूया...
Dr. (Mrs) Suchit Kamalapur
Consultant Dietitian
Nice article
ReplyDeleteSo true! Generally, one ends up eating more on fasting days. Lets make a conscious effort!
ReplyDelete