राही एक कर्तबगार आई, बायको आणि सून. ऑफिसमध्ये कार्यक्षम, सोसायटीच्या कामात पुढे असणारी राही. अर्थातच बाकी नातेवाईकांच्याही अपेक्षा सांभाळणारी राही. किती आदर्श आहे ना राही ?
प्रत्यक्षात रोजच्या तणावामुळे अगदी शांत झोपही लागत नाही राहीला . सगळ्यांना खुश ठेवताना होणारी दमछाक तिला असह्य होते आहे. ताणतणावामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम तिला जाणवतो आहे.
आजूबाजूला पाहिले तर अशा बऱ्याच राही दिसतील. थोड्याफार फरकाने यासारखीच दिनचर्या असणाऱ्या कितीतरी राही.
कदाचित हा सुपरवूमन सिन्ड्रोम असू शकतो.
सुपरवूमन ही संज्ञा १९८४ ला पहिल्यांदा वापरात आली. स्वतःला त्रास झाला तरी चालेल किंवा स्वतःकडे दुर्लक्षही झाले तरी चालेल म्हणजेच स्वतःचा विचार न करता, सर्व गोष्टी मीच करणार ह्या स्वभावाला सुपरवूमन सिन्ड्रोम म्हणता येईल.
सुपरवूमन सिन्ड्रोममुळे बऱ्याच वेळा स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा सगळ्यांना खुश करण्यासाठी स्त्रिया बरेच काही करतात . यातून कधी दुर्लक्ष झालेच तर स्वतःला दोष देतात. सर्व परिपूर्ण असण्याच्या अट्टाहासात स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात.
आपण या प्रतिमेत अडकत आहोत का यासाठी आपण काही गोष्टी तपासून पाहू शकतो -
- मीच सर्व करणे गरजेचे आहे वाटते का ?
- उशिरा पर्यंत जागून कामे करण्याची गरज पडते का ?
- व्यायाम करायचा कंटाळा येतो का? की वेळच मिळत नाही
- सतत परफेक्ट असावे असे वाटते का ?
- सतत कारण नसताना चिडचिड होते का ?
- कारण नसताना गोष्टी विसरत आहात का ?
- अकारण कशाची तरी सतत चिंता सतावते आहे का? अस्वस्थता जाणवते का ?
- अकारण अंगदुखी, डोकेदुखी जाणवते का ?
- मन एकाग्र करायला त्रास होतो का ?
- निद्रानाशाचा किंवा निद्रातिरेकाचा त्रास होतो का ?
या प्रश्नांची उत्तरे हो असतील किंवा खालील प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर विचार करण्याची नक्कीच गरज आहे असे वाटते .
- उद्याबद्दल सकारात्मक आहात का ?
- शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहात का ?
- स्वतःसाठी वेळ देता का ?
- काम करताना उत्साह वाटतो का?
- मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईक यांची Support system आहे का ?
कदाचित कुटुंबातले नवरा, मुले, सासू सासरे , नातेवाईक म्हणतील आम्ही कुठे तू स्वतःकडे दुर्लक्ष करून फक्त आमच्याकडेच लक्ष दे सांगितले? तू का नाही स्वतःला वेळ दिला ? वाल्याकोळ्यासारखी आपली अवस्था नाही ना ?
इतर सर्वांना खुश ठेऊन, स्वतःकडे दुर्लक्ष करून शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करणे किती योग्य आहे ?
मला वाटते, खरं तर सुपरवूमन सिन्ड्रोम मधून बाहेर येण्याची गरज आहे.
सुपरवूमन प्रतिमेत न अडकण्यासाठी या काही गोष्टी करून पहा -
- स्वतः साठी वेळ द्या
- स्वतःचे लाड करा, मजेत रहा
- शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूक रहा
- परिपूर्णच असणे गरजेचे नाही हे लक्षात ठेवा
- स्पष्टपणे नाही म्हणायला शिका
- गरज असेल तर मदत मागा. मदत मागणे किंवा कोणापाशी मन मोकळे करणे यात कमीपणा नाही .
very very well said madam...everyone should give it a thought, rather one must try implementing it from this moment itself..
ReplyDelete