"अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीच्या देणगीतून बांधले कुरमा घर" ही बातमी वाचली आणि कुरमाघरासाठी देणगीची काय गरज हा प्रश्न मला पडला. आता हे कुरमा घर म्हणजे काय? खरं सांगू मलाही या बद्दल फारशी माहिती नव्हती. नेहमी प्रमाणे गूगलवर शोधल्यावर खूपच धक्कादायक माहिती मिळाली. गावाबाहेर एखादी झोपडी बांधून त्यात गावातील ज्या महिलांची मासिकपाळी (Menstruation) सुरु आहे त्यांची राहण्याची व्यवस्था म्हणजे कुरमा घर. आपल्याच महाराष्ट्रात काही ठिकाणी अशी कुरमा घरं आहेत. पण तेथे ना चांगले शौचालय, न्हाणीघर आहे ना स्वच्छता. काही ग्रामीण भागात अशा कुरमा घराची पद्धत नसली तरी पण स्वच्छ पाणी व इतर सुविधेच्या अभावामुळे स्वच्छते कडे दुर्लक्ष होत आहे.
स्त्रियांच्या आयुष्यातील मासिक पाळी महत्वाचा व नाजूक काळ. याच काळात तिच्यामध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात त्यामुळे रूढी परंपरा यापेक्षा आज स्वच्छता आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल बोलणे गरजेचे आहे. मासिक पाळी हा काही चर्चा करण्याचा विषय नाही म्हणून तो टाळला जातो. एका अभ्यासानुसार साधारण २.३ कोटी मुली मासिक पाळी सुरु झाल्यावर आपले शालेय शिक्षण सोडून देतात. मासिक पाळीबाबत अनेक गैरसमजुती असतात. त्याविषयी ना घरात चर्चा केली जाते ना शाळेत. पण मासिक पाळी ही श्वसनाइतकीच नैसर्गिक प्रक्रिया नाही का ?
शाळेत, महाविद्यालयात, कार्यालयात व त्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. मासिक पाळीचे वय हे हल्ली काही मुलींमध्ये थोडे कमी झाल्याचेही दिसून होते. स्वच्छता कशी ठेवावी, कोणत्या गोष्टी वापराव्या, काय खबरदारी घ्यावी यासाठी महिलांचे व मुलींचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. जर स्त्री निरोगी असेल तरच घर निरोगी राहील. सॅनिटरी पॅड, टॅम्पॉन (Tampons) , मेन्स्ट्रुअल कप याचा वापर , पॅड किती वेळा आणि केव्हा बदलावे , मेन्स्ट्रुअल कप कसा आणि किती वेळा स्वच्छ करावा हे सांगणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्यावेळी स्वच्छता न राखल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे अगदी मोठ्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही जास्त असल्याचे लक्षात आले आहे. या covid -१९ च्या काळात तर ग्रामीणभागातील महिला व शहरातील महिलांबरोबरच ज्या आरोग्य कर्मचारी महिला आहेत त्यांना अतिरिक्त आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस या बरोबरच आशा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
दोन मासिक पाळीतील अंतर हे साधारण २८ दिवसाचे असते आणि साधारण ५ दिवस रक्तस्त्राव होतो यामुळे जर्मन येथील WASH युनाइटेड या सामाजिक संस्थेने २८ मे हाच दिवस दिवस "Menstrual Hygiene Day" म्हणून जाहीर केला. पण कार्यक्रम घेण्यापुरता हा दिवस मर्यादित राहू नये. मासिक पाळीविषयी कशी जनजागृती करून महिलांचे कसे प्रबोधन करता येईल हे पाहणे महत्वाचे आहे. यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याकडे काही उपाय असतील तर नक्कीच आम्हाला पाठवू शकता.
Special Thanks to : Dr. Vaidehi Lomate and Photo by Sora Shimazaki from Pexels
0 comments:
Post a Comment
Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment